मराठी साहित्यासेवेला आराधना मानत व मराठी भाषेबद्दलची आपुलकी या जाणीवेतून अधिष्ठानच्या प्रवासाचा आरंभ झाला.
नोकरी करता करता अधिष्ठान दिवाळी अंक अप्रतिहत प्रकाशित करण्याचे कार्य स्व. मनोहर पांचाळ यांनी केले.
‘इंडियन ऑईल’ या प्रख्यात तेल कंपनीत ते कार्यरत होते. या दरम्यान दिवाळी अंकाची संस्थापना व संपादन करण्याच्या ध्येयाने ते प्रेरित झाले
व १९७५ साली पहिला अधिष्ठान दिवाळी अंक वाचकांच्या भेटीस आला.
अधिष्ठान अविरत प्रकाशित करण्याच्या प्रवासात त्यांना कुटुंबाची साथ तर होतीच व
त्यांच्या मित्र परिवाराने देखील भक्कम पाठींबा दिला. अधिष्ठान अंकास उत्तम साहित्यिक लाभले व मनोहर पांचाळ यांनी देखील प्रत्येक साहित्यीकाशी सलोख्याचे व प्रेमाचे संबंध जपले.
अंकातून फायदा करून घेणे हा उद्देश त्यांनी मनात कधीच बाळगला नाही. निव्वळ साहित्य प्रेमापोटी त्यांनी ४१ वर्षे अंक प्रकाशित केले.
अधिष्ठान अंकास अनेक गौरवचिन्हे व सन्मानपत्रांनी पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रस्तरांवर सर्वत्र व गोवा, कर्नाटक या राज्यात देखील अंक प्रसिद्ध झाला.
३ फेब्रुवारी २०१६ रोजी मनोहर पांचाळ यांचे दुखद निधन झाले.
अंका संबंधित कार्याचा जवळ जवळ सारा भार ते एकटेच पेलत असल्यामुळे त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली.
अशा कठीण प्रसंगात मात्र शिवाजी धुरी, अनिल पाटील, प्रदीप गोनबरे, किशोर फाळके, उदय विलणकर व इतर शुभचिंतकांनी
अधिष्ठान परिवाराला मोठा आधार दिला व त्यामुळेच ४२वा अंक दिवाळी २०१७ ला यशस्वीरित्या प्रकाशित होऊ शकला.
अधिष्ठान २०१७ हा अंक मनोहर पांचाळ यांच्या स्मरणार्थ व त्यांस आदरांजली म्हणून समर्पित होता.
अधिष्ठान अंकाने नेहमीच प्रेरणादायी, आध्यात्मिक,
सामाजिक जागरूकता, माहितीगार व मनोरंजनात्मक विषयांवरच्या साहित्याला प्राधान्य दिले आहे. ही परंपरा अशीच चालू ठेवण्याच्या संकल्पनेने
अधिष्ठान २०१८ दिवाळी अंक देखील उत्कृष्ट साहित्य घेऊन वाचकांच्या भेटीस येत आहे व दिवाळीच्या आगमानाची आतुरतेने वाट पाहत आहे.